कल्याणमध्ये ७० वर्षीय ज्येष्ठाला तोतया पोलिसाने लुटले; सोन्याची अंगठी व मोबाईल घेऊन फरार
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण : राज्यात चोरी व फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना कल्याण शहरात एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधारवाडी भागातील अन्नपूर्णानगर येथील रहिवासी प्रमोद भास्कर जोशी (७०) यांना बनावट पोलिस अधिकाऱ्याने लुटल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपीचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. रविवारी सकाळी प्रमोद जोशी खरेदीसाठी बाहेर पडले होते. ते सहजानंद चौकातून गणपती चौकाकडे जात असताना अचानक ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने त्यांना धक्का दिला. धक्क्यानंतर त्या व्यक्तीने आपला मोबाईल जमिनीवर टाकला आणि तो फुटल्याचे नाटक करून म्हणाला –
“तुमच्यामुळे माझा मोबाईल फुटला आहे. मी पोलीस आहे, भरपाई द्या, नाहीतर सोडणार नाही.” धमकीमुळे गोंधळलेल्या जोशींना आरोपीने हातातील मोबाईल व सोन्याची अंगठी काढून घेतली. त्यानंतर जबरदस्तीने रिक्षात बसवून मोबाईल गॅलरीकडे नेण्याचे नाटक केले. रिक्षा गांधारी रस्त्यावर पोहोचल्यावर आरोपीने ‘तुमचा मोबाईल मिळाला’ असे सांगत एक मोबाईल रस्त्यावर फेकला. नंतर रिक्षासह तो फरार झाला. रस्त्यावर पडलेला मोबाईल पाहिला असता तो जोशींचाच असल्याचे दिसले, मात्र सोन्याची अंगठी मात्र गायब झाल्याचे लक्षात आले.
फसवणुकीची जाणीव होताच प्रमोद जोशी यांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची माहिती दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच हे प्रकरण ज्येष्ठांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.