अनैतिक संबंधांच्या वादातून ३८ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; मृतकाच्या पत्नीसह प्रियकराला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक-मुंबई महामार्गावरील गरवारे बसस्टॉपजवळ अनैतिक संबंधांच्या वादातून एका ३८ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष उर्फ छोटू काळे (३८) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी संतोषची पत्नी पार्वती आणि तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष काळे शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होता. तो उशिरापर्यंत घरी परतला नसल्यामुळे त्याचे वडील अशोक काळे यांनी कुटुंबीयांसोबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली असता, शनिवारी सकाळी गरवारे बसस्टॉपच्या मागे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, मृताच्या डोक्यावर आणि शरीरावर मोठ्या दगडाने वार केल्याचे दिसून आले. प्रचंड रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, अशोक रामा काळे (५५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा संतोष याने त्यांना अनेकदा सांगितले होते की त्याची पत्नी पार्वती आणि प्रफुल्ल कांबळे यांचे अनैतिक संबंध आहेत. अशोक काळे यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले होते, परंतु दोन दिवसांपूर्वी संतोष आणि पार्वती यांच्यात याच कारणावरून जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे पत्नी पार्वती आणि तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे यांनी मिळून आपल्या मुलाचा खून केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. फिर्यादीनंतर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली आणि मृत संतोषची पत्नी पार्वती काळे हिला तत्काळ अटक केली. अधिक चौकशी केली असता, तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे हा अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, नाशिक पोलिसांनी नगर पोलिसांच्या मदतीने प्रफुल्ल कांबळे याला ताब्यात घेतले. इंदिरानगर पोलीस पुढील तपास करत आहेत.