गिरीश महाजनांचा कार्यकर्त्यांना सल्ला : “विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना भाजपात घ्या”
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव – राज्यातील भाजपमध्ये सातत्याने होणाऱ्या पक्षप्रवेशांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असताना, जलसंपदा मंत्री व भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. “विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना आपल्या पक्षात घ्या, कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करू नका” असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
जामनेर येथे झालेल्या भाजपच्या जिल्हा कार्यशाळेत महाजन कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. या वेळी त्यांनी विरोधकांना आपल्या पक्षात सामावून घेण्यावर भर दिला. “दुसऱ्या पक्षातील नेता, कार्यकर्ता कसाही असूद्या पण कामाचा माणूस असेल तर त्याला भाजपात स्थान द्या. फक्त फोटोबाजी करणाऱ्याला किंमत नाही, पण काम करणाऱ्या प्रत्येकाला पक्षात महत्त्व आहे,” असं ते म्हणाले.
महाजन पुढे म्हणाले की, “कितीतरी लोक पूर्वी भाजपवर टीका करत होते, पण आज तेच आपल्याकडे आले आहेत. विरोधकांची तोडं बंद करायची आहेत, म्हणूनच त्यांना आपल्याकडे आणणं गरजेचं आहे. कार्यकर्ता छोटा असला तरी त्याला पक्षात घ्या आणि त्याचे स्वागत करा.”
गिरीश महाजन हे भाजपचे बड नेते व “संकटमोचक” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून अनेक नेते, पदाधिकारी यापूर्वीही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या पक्षप्रवेशांची चर्चा रंगू लागली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य करताना महाजन म्हणाले, “महायुतीतच आपण लढणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना एकही जागा मिळता कामा नये.”
त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्या या विधानानंतर पुढील काळात कोणते नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.