ऑनलाईन गेमिंगमधील मैत्रीचा धोकादायक शेवट; पुण्याची १७ वर्षीय विद्यार्थिनी २१०० किमी प्रवास करून फसली, लैंगिक अत्याचार उघड
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – “विद्येचं माहेरघर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाणेर येथील अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर झालेल्या ओळखीच्या नादाला लागून तब्बल २,१०० किलोमीटर प्रवास केला आणि पश्चिम बंगालपर्यंत पोचली. मात्र विश्वास ठेवलेल्या व्यक्तीकडूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने या घटनेने समाजमनाला चटका लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे. १८ जुलै रोजी ती घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या काकांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित तिच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत तपास सुरू केला. सात दिवसांच्या प्रयत्नांनंतर तपास अधिकारी मनीषा जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नागरकाटा, जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) येथे मुलीचा ठावठिकाणा लावला आणि तिला सुखरूप परत आणले.
मात्र मुलीच्या जबाबानंतर केवळ अपहरण नव्हे तर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. परिणामी आरोपीवर अपहरण, लैंगिक अत्याचार तसेच पोस्को कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३० वर्षीय आरोपीला ६ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
तपासात समोर आले की, मुलगी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर आरोपीच्या संपर्कात आली होती. सुरुवातीला गेमच्या माध्यमातून संवाद सुरू झाला आणि हळूहळू मोबाईल नंबर व मेसेजिंग ॲप्सवरून गप्पा रंगू लागल्या. विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपीने तिला गावाला येण्यास प्रवृत्त केले. आरोपीला भेटण्यासाठी ती थेट पश्चिम बंगालला रवाना झाली. मात्र तिथे पोचल्यावर तिच्यावर लैंगिक शोषण झाले.
या घटनेतून आजच्या डिजिटल युगातील ऑनलाइन सुरक्षेचं गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, मुलांना पूर्णपणे ऑनलाइन जगापासून दूर ठेवणे अवघड आहे. त्यामुळे पालकांनीच मुलांशी खुल्या मनाने संवाद साधणे, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण नातं ठेवणे आणि त्यांच्या शंका-प्रश्नांना योग्य उत्तर देणे अत्यंत गरजेचे आहे. ही घटना प्रत्येक पालक आणि मुलांसाठी एक मोठा इशारा व धडा ठरू शकते.