सफाळे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; सहा तासांत चोरी उघडकीस
पालघर / नवीन पाटील
सफाळे पश्चिम येथील माकणे पंडितपाडा गावात गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) झालेल्या तीन लाखांच्या चोरीचा सफाळे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत तपास लावून आरोपीला जेरबंद केले. विशेष म्हणजे चोरी केलेली संपूर्ण तीन लाख रुपयांची रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
बंटी दळवी यांच्या घरातील कपाटातून गुरुवारी दुपारी तीन लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने सफाळे पोलिस ठाण्यात दाखल केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके आणि उपनिरीक्षक कैलास खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळावरील परिसरात सखोल चौकशी करून स्थानिकांना विश्वासात घेतले. त्यानंतर याच गावातील एका इसमाने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून तीन लाख रुपये मुद्देमाल हस्तगत केला.
या आरोपीविरुद्ध सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.