कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : अपुऱ्या कागदपत्रांद्वारे दहा ते बारा कोटी रुपयांचं मोठं कर्ज मिळवून देण्याचं आश्वासन देत लखनऊ येथील एका व्यक्तीला तब्बल ४० लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
लखनऊ येथे वास्तव्य करणारे तक्रारदार आपल्या घराचे चित्रपट आणि मालिकांसाठी चित्रीकरणाकरिता भाड्याने देतात. यातून चांगला नफा मिळत असल्याने घर विस्तारासाठी त्यांना दहा ते बारा कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. त्यांनी ही बाब कुर्ला येथील मित्राला सांगितली. त्याने ओळख करून दिलेल्या अनिस या व्यक्तीने बँकेकडून मोठं कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवलं.
कर्ज प्रक्रियेसाठी ५० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगत आरोपींनी सुरुवातीला तक्रारदाराकडून २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वेळोवेळी मागणी करून एकूण ४० लाख रुपये स्वीकारले. मात्र, अनेक महिने उलटूनही कर्ज मंजूर झाले नाही. वारंवार चौकशी करूनही आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने तक्रारदारांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली. या फसवणुकीत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध सुरू असून विनोबा भावे नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.