मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी ८ सप्टेंबर २०२५ रोजी असणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ईद-ए-मिलाद या इस्लाम धर्मीयांच्या महत्त्वाच्या सणानिमित्त मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याआधी शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता ही सुट्टी सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी असणार असल्याची घोषणा सामान्य प्रशासन विभागाने केली आहे. शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू धर्मीयांचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली जाते. त्यामुळे राज्यात ऐक्य व सलोखा टिकवण्यासाठी मुस्लीम समाजातील प्रमुखांनी हिंदू – मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच सरकारने ५ सप्टेंबरला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून ८ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ८ सप्टेंबर रोजी असेल.इतर सर्व जिल्ह्यांसाठी मात्र यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ५ सप्टेंबर रोजीच सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.त्यामुळे ग्रामीण भागात व राज्यातील इतर जिल्ह्यांतील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी बंद राहतील. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर सरकारी विभाग ५ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सुरु राहतील. सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, नागरिकांनी या बदलाबाबत संभ्रम न ठेवता कामकाजाच्या तारखा लक्षात ठेवाव्यात. राज्यातील दोन महत्त्वाचे सण अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद लोख्याने साजरे करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईत ५ सप्टेंबर रोजी सर्व कार्यालये आणि शाळा सुरु राहतील, तर ८ सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी असेल. मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये ५ सप्टेंबरलाच सुट्टी राहणार असल्याने मुंबईकरांनी सुट्टीच्या तारखेत झालेल्या या बदलाची विशेष नोंद घ्यावी.