धुळ्यात बोहल्यावर चढवून गंडा घालणारी टोळी गजाआड!
पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; एजंटसह तीन महिलांना अटक करण्यात यश
योगेश पांडे / वार्ताहर
धुळे – लग्नाळू तरुणांना बोहल्यावर चढवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे. शहरातील एका तरुणाला या टोळीने अशाच पध्दतीने गंडवले होते. त्याने चाळीसगाव रोड पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी सापळा लावत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एजंटसह तीन महिला पोलिसांच्या हाती लागल्या असून त्यांना जेरबंद केले आहे. दरम्यान, आपण अशाच पध्दतीने अनेक लग्नाळू तरुणांना गंडविल्याचे या टोळीने कबुल केले आहे. शहरातील अलंकार सोसायटीत राहणारा तुषार रमेश खैरनार याचे लग्नाचे वय अधिक झाल्याने त्याची आई त्याच्यासाठी लग्नाचे स्थळ शोधत होती. २१ ऑगस्ट रोजी तुषारच्या आईला लग्न लावणाऱ्या एजंटचा मोबाईल क्रमांक नातेवाईकांकडून मिळाला. ला लावणारा एजंट हा नागपूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले. २५ ऑगस्ट रोजी तुषारच्या आईने सांगितल्याप्रमाणे एजंट, लग्न करणारी मुलगी, तिच्या सोबत तिची बहीण असे तिघे तुषारच्या घरी आले. मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एजेंट याने लग्न लावण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये लागतील असे सांगितले.
तुषारच्या घरच्यांनी एजंट व मुलीच्या बहीणीस १ लाख ३० हजार रुपये रोख व ऑनलाईन पध्दतीने दिले. त्यानंतर तुषारचे लग्न काजल (२०) नामक मुलीशी एकविरादेवी मंदीर येथे लावून देण्यात आले. लग्नाच्या अवघ्या एक ते दोन दिवसांत तुषार याला पत्नी काजल हिच्या वागणुकीवरून संशय आला. त्याने तिच्या आधारकार्डाची पडताळणी केली. ती राजस्थान येथील असल्याचे त्याला समजले. त्यानंतर काजल हिचे इन्स्टाग्राम आयडीची तपासणी केली असता तिच्या गळ्यात मंगळसूत्र व सोबत लहान मुलगा असल्याचे दिसून आल्याने तरुणाचा संशय अधिक बळावला. त्यांनतर तुषार याने घरातील लोकांना विश्वासात घेवून सर्व हकिकत सांगितली. पुन्हा मैत्रीणीच्या भावाला मुलीचे स्थळ आणा म्हणून एजंट सचिन मरगडे यास संपर्क करण्यात आला. त्याने उज्जैन येथे मुलगी आहे, तिला दाखविण्यास घेवून येतो असे सांगितले. त्याप्रमाणे पुनम नावाच्या मुलीला दाखवायला एजेंट हा घेवून आला. लग्नासाठी दलाली म्हणून १ लाख ५० हजार रुपयाची मागणी त्याच्याकडून करण्यात आली. १ सप्टेंबर रोजी या संशयाबाबत तुषारने चाळीसगाव रोड पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरुन तुषारने चाळीसगाव रोड चौफुली येथे एजंट सचिन मरगडे व तुषार याची तथाकथीत पत्नी काजल, काजल हिची बहीण असल्याची सांगणारी नेहा व उज्जैन येथून आलेली मुलगी पुनम अशांना बोलावून घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांना सापळा लावून जेरबंद केले. त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. एजंट व या तिघांनी मिळून यापुर्वी अनेक ठिकाणी पैसे घेतले. लग्न लावले. तरुणांची फसगत करत फळ काढल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी तुषार रमेश खैरनार याने दिलेल्या फिर्यादीवरून एजंट सचिन मरगडे काजल, काजलची बहिण सांगणारी नेहा, उज्जैन येथून आलेली मुलगी पुनम या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली.