७० वर्षीय कामाठी वृद्धाकडून लाच घेताना शिक्षकासह मुख्याध्यापक रंगेहात

Spread the love

७० वर्षीय कामाठी वृद्धाकडून लाच घेताना शिक्षकासह मुख्याध्यापक रंगेहात

नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा; तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

पोलीस महानगर नेटवर्क 

नंदुरबार : सेवानिवृत्त ७० वर्षीय कामाठी वृद्धाकडून प्रोत्साहन भत्ता देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारणाऱ्या शिक्षकासह मुख्याध्यापकाला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. २८ ऑगस्ट २०२५) सायंकाळी चिनोदा फाटा, तळोदा येथे करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, शासकीय आश्रमशाळा, जांभयी (ता. तळोदा) येथे कामाठी पदावर कार्यरत असलेले तक्रारदार हे सन २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. सन २००६ ते २०१४ या कालावधीतील प्रोत्साहन भत्त्याचे एकूण रु. ५४,९५६/- इतके देयक प्रलंबित होते. हे देयक तयार करून देण्याच्या मोबदल्यात प्राथमिक शिक्षक भागवत नारायण जगताप (वर्ग ३) यांनी तक्रारदार वृद्धाकडे १,५०० रुपयांची लाच बक्षीस म्हणून मागितली होती.

या संदर्भात तक्रारदाराने २६ ऑगस्ट रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. पडताळणी दरम्यान शिक्षक जगताप यांनी प्रत्यक्ष लाचेची मागणी केली असून, मुख्याध्यापक अनील देवराम झाल्टे यांनीही त्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विभागाच्या पथकाने २८ ऑगस्ट रोजी सापळा रचला. तळोदा तालुक्यातील चिनोदा फाटा येथे तक्रारदाराकडून १,५०० रुपयांची रक्कम स्वीकारताच शिक्षक जगताप रंगेहात पकडले गेले.

लाच प्रकरणी शिक्षक जगताप व मुख्याध्यापक झाल्टे या दोघांविरुद्ध भ्र.प्र.अधिनियम, १९८८ चे कलम ७ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तळोदा पोलीस ठाण्यात सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पो.नि. विकास लोंढे, एएसआय विलास पाटील, हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे, देवराम गावीत व हेमंकुमार महाले यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon