इन्स्टाग्रामवरून ओळख; १४ वर्षीय मुलीवर १८ वर्षीय तरुणाकडून अत्याचार
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियावरील मैत्रीचे गंभीर परिणाम दाखवणारी एक धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या इन्स्टाग्रामवरील ओळखीच्या १८ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी दिवांशु मेरावी हा पाचपावली, ठक्करग्राम येथील रहिवासी असून, त्याच्याविरुद्ध पोस्को कायदा कलम ४ व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
पीडित मुलगी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिकते. दोन महिन्यांपूर्वी तिची आरोपीसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यातून हळूहळू मैत्री वाढली. २३ ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या आजीच्या समता नगर येथील घरी एकटी असताना आरोपीला भेटण्यासाठी बोलावले. या संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली.
घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नाही. मात्र, तिच्या वागण्यात अचानक बदल जाणवल्याने कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तातडीने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.
समाजमाध्यमांवरील धोक्याचा इशारा
या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींबाबत सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पालकांनी आपल्या मुलांशी सतत संवाद ठेवावा, त्यांना ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन करावे, अनोळखी व्यक्तींशी भेटणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे.