विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला जाळून मारल्यानंतर आत्महत्येचा बनाव; ७ वर्षांच्या चिमुकलीच्या साक्षीने आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – एका व्यक्तीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून आपल्या ३२ वर्षीय पत्नीला जाळून मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने या प्रकाराला पत्नीने स्वत:चा जीव घेतला असं दाखवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याच्या सात वर्षांच्या मुलीने पोलिसांना सारं स्पष्टपणे सांगितले. तिच्या वडिलांनी तिच्या आईला जाळलं, असं या चिमुकलीने सांगितलं. तेव्हा त्याचा खोटारडेपणा उघड झाला. २५ ऑगस्ट रोजी पहाटे उरण परिसरातील पागोटेगाव येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपीला दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली आहे. उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हनीफ मुलानी यांनी पीटीआयला सांगितले की, आरोपी राजकुमार रामशिरोमणी साहू याला त्याची पत्नी जगराणी राजकुमार साहू यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने पीडितेचे हातपाय बांधले, तिच्यावर रॉकेल ओतले आणि लाईटरने तिला जाळून टाकले.
महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपीने दावा केला होता की त्याच्या पत्नीने स्वतःला घराच्या एका खोलीत कोंडून घेतले आणि आपल्या आयुष्याची अखेर केली, त्यानंतर सुरुवातीला अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण तपासात त्याच्या जबाबात तफावत आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि जोडप्याच्या सात वर्षांच्या मुलीच्या महत्त्वपूर्ण जबाबानंतर या प्रकरणाचं संपूर्ण सत्य समोर आलं. आरोपीने दावा केला होता की त्याच्या पत्नीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि जीव दिला. परंतु मुलाचे जबाब पतीच्या जबाबाशी जुळत नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले आणि त्यात घटनेनंतर काही तासांत आरोपी घराबाहेर पडताना दिसून आला. हा एक महत्त्वाचा पुरावा होता जो घटनेवेळी घरी उपस्थित नव्हता या पुरूषाच्या दाव्याच्या विरोधात जात होता, असंही अधिकाऱ्यांनी सांगितले. पतीला अटक करण्यात आली असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.