डॅडी अखेर तुरुंगाबाहेर! नगरसेवक हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर; वयाचा विचार करुन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्याकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरुण गवळीने जन्मठेप प्रकरणी आतापर्यंत १७ वर्षे कारागृहात शिक्षा भोगली आहे. त्याचे वय सध्या ७६ वर्षे असून, वयाचा विचार करुन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
खंडणी, आर्थिक लाभ आणि मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील अनेक मालमत्ता हडप करण्यासाठी लोकांना धमक्या दिल्याचा अरुण गवळी आणि त्याच्या टोळीवर आरोप आहे. या प्रकरणी त्याच्या टोळीवर अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईमधील लालबाग, परळ, भायखळा, करीरोड, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागात अरूण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. सन २००४ साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीने शिवसेनेच्या मोहन रावले यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते आणि अरूण गवळीचे भाचे सचिन अहिरही निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी अरूण गवळीला ९२ हजार मते मिळाली होती.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरूण गवळीला २००७ मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.