गणपती बाप्पाच्या आगमनाला पावसाचा बँडबाजा, मुंबई-ठाण्यासह २० ठिकाणी येलो अलर्ट
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंतच्या परिस्थितीच्या आकलनाच्या आधारे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. या स्थितीचा अंदाज घेऊन, प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात एकूण १८ एनडीआरएफ पथके आणि ६ एसडीआरएफ पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईत २ एनडीआरएफ पथके कायमस्वरूपी तैनात असून, ३ पथके मान्सूनसाठी तयार आहेत. त्याचबरोबर, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, कराड, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर आणि पुणे येथेही पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. एनडीआरएफ ची पथके नागपूर, गडचिरोली, धुळे आणि नांदेड येथे तैनात आहेत.
गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्यात ३४.७ मिमी इतका नोंदवला गेला आहे. त्यापाठोपाठ पालघरमध्ये ३०.३ मिमी, ठाण्यात ३० मिमी, नंदुरबारमध्ये २७.१मिमी आणि रत्नागिरीत १७.५मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मुंबई उपनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून, भिंत कोसळून एक व्यक्ती जखमी झाली आहे. प्रशासनाचे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, आयएमडी आणि एनआरएससी यांसारख्या केंद्रीय संस्थांकडून हवामानाची माहिती घेऊन ती सर्व जिल्ह्यांना पाठवली जात आहे.