नाशिक पोलिसांकडून ‘चड्डी गँग’च्या चार दरोडेखोरांना अटक;२८ धारदार चाकू जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिकमध्ये ‘चड्डी गँग’च्या चार दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. हे चोर दिवसा पायदान विकण्याच्या नावाखाली रेकी करायचे. रात्री दरोडा टाकायचे. पोलिसांनी त्यांच्याकडून २८ धारदार चाकू आणि एक कोयता जप्त केला आहे. ते पळसे शिवारात दरोड्याच्या तयारीत होते. दुसरीकडे, नाशिकरोड पोलिसांनी अवैध गॅस भरणा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. एका व्यक्तीला अटक केली असून, ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांत दिवसा पायदान विक्रीच्या नावाखाली रेकी करून रात्रीच्या वेळी दरोडा टाकणाऱ्या हाफ चड्डी गँगच्या चार अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात आली. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अंधारात भर पावसात मक्याच्या शेतात तासभर सिनेस्टाइल सर्च ऑपरेशन राबवून संशयितांना बेड्या ठोकल्या. या दरोडेखोरांकडे तब्बल २८ धारदार चाकू आणि एक कोयता अशा शस्त्रांचे घबाड आढळल्याने सुरुवातीला पोलिसही चक्रावून गेले. हे चारही दरोडेखोर पळसे शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपआयुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी दिली.
रवीकुमार भोई (२७), शिवा विक्रम वैदू (३६), विष्णू शंकर भोई (३०) आणि आकाश गोपाळ वैदू (३८) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.