मुंबईतील मालाड पूर्व येथे वैष्णवी हाइट्स इमारतीला भीषण आग; सुदैवाने या आगीत जीवितहानी नाही
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई शहरातील मालाड पूर्व इथं रविवारी एका रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली. मालाड पूर्वेतील राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी हाइट्स या इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीत काही रहिवासी अडकल्याची भीती असून दुर्घटनेबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाहिये.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील वैष्णवी हाइट्स या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर रविवारी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. त्यानंतर इमारत परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिकांनी या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर काही वेळातच १० ते १२ गाड्यांसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसंच दिंडोशी पोलीस ठाण्याचे कर्मचारी काही वेळातच वैष्णवी हाइट्स इथं पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आगिवर नियंत्रण मिळवले.
वैष्णवी हाइट्स ही रहिवासी इमारत असल्याने या इमारतीत अनेक नागरिक वास्तव्यास होते. आग लागलेल्या मजल्यावरील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली.दरम्यान, या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ११ व्या मजल्यावरही काही घरांमधील सर्व सामान जळून खाक झाले आहे.