१५ ऑगस्टला केडीएमसी हद्दीत मटण विक्रीवर बंदी; खाण्यावर नाही – आयुक्तांचे स्पष्टीकरण
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) हद्दीतील कत्तलखाने व मटण-मांस विक्री बंद ठेवण्याच्या आदेशावरून निर्माण झालेल्या वादाला बुधवारी आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्टीकरण दिले. “शहरात मटण, मांस खाण्यावर कोणतीही बंदी नाही; फक्त विक्रीवर आणि कत्तलखाने सुरू ठेवण्यावर शासन निर्णयाप्रमाणे बंदी आहे,” असे ते म्हणाले.
शासन निर्णयानुसार जुना आदेश
आयुक्त गोयल यांनी सांगितले की, १९८७ च्या शासन निर्णयानुसार मागील अनेक वर्षांपासून १५ ऑगस्टला केडीएमसी हद्दीत कत्तलखाने बंद ठेवण्याची व मटण-मांस विक्री थांबवण्याची पद्धत सुरू आहे. यात नवीन काहीही निर्णय घेतलेला नसून, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी आदी महापालिकांनीही अशाच आदेशांची अंमलबजावणी केली आहे.
कायदा-सुव्यवस्थेची खबरदारी
स्वातंत्र्यदिनी मटण खाण्याची मेजवानी आयोजित करण्याचा इशारा काही राजकीय नेत्यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर, कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती हाताळली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. अनेक संघटना व राजकीय नेत्यांनी या निर्णयाविरोधात निवेदने दिली असून, लोकभावनेचा विचार करून प्रशासन यावर पुढील पातळीवर विचार करेल. ठोस बदल झाल्यास त्याची माहिती माध्यमांद्वारे दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
राजकीय विरोधाचा जोर
या निर्णयावर गेल्या तीन दिवसांपासून टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, युवा नेते आदित्य ठाकरे, मनसे नेते राजू पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपश म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, मनसेचे मनोज घरत, ठाकरे गटाचे सुधीर बासरे, अभिजीत सावंत तसेच हिंदु खाटिक समाज संस्थेचे शिरीष लासुरे यांनी हा आदेश तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. हिंदु खाटिक समाजाने तर आदेश मागे न घेतल्यास पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मटण विक्री करण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे व परवाना विभाग उपायुक्त कांचन गायकवाड उपस्थित होते.