जमिनीच्या वादाचा वचपा काढला; धाराशिवमध्ये भररस्त्यात पती पत्नीला संपवलं, थरारक घटनेनं जिल्हा हादरला
योगेश पांडे / वार्ताहर
धाराशिव – जमिनीच्या वादातून धाराशिवमध्ये दोघांनी पती-पत्नीची भर रस्त्यावर निघृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे . जमिनीच्या वादातून भर चौकात गाडीची धडक, खाली पडताच कोयत्याने वार करत पती-पत्नीला संपवल्याचा प्रकार घडला. धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात बुधवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर दोन्ही संशयित आरोपी फरार असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. मृतांमध्ये सहदेव पवार आणि प्रियांका पवार या पती-पत्नीचा समावेश आहे. तर संशयीत आरोपींची नावे जीवन चव्हाण आणि हरिबा चव्हाण अशी असून दोघेही सध्या फरार आहेत. बुधवारी सकाळी झालेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बुधवारी सकाळी सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार चौकातून जात असताना आरोपींनी तुळजापूर सोलापूर हायवे वरील करजखेडा गावातील भर चौकात दांपत्याच्या गाडीला धडक दिली. धक्क्याने गाडी थांबताच आरोपींनी कोयत्याने पती-पत्नीवर वार करत त्यांचा खून केला. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले. आरोपी जीवन हरिबा चव्हाण आणि हरिबा यशवंत चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत.आरोपी चव्हाण बापलेक व मृतसहदेव यांचा जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून सहदेव यांच्यावर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. गेली अनेक वर्ष सहदेव जेलमध्ये होता. दरम्यान छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर जमिनीच्या वादाचा वचपा म्हणून पवार दांपत्याची निर्घृण हत्या केली.