अंगात भूत असल्याची भीती दाखवून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार;विरार पोलीसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अंगात ४ भूत असल्याची भीती दाखवून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडित मुलगी मित्रासोबत जीवदानी मंदिरात गेली होती. त्यावेळी तिच्या अंगात आलं. तिच्या अंगात भूत आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर तिच्या मित्राने तिला एका भोंदू बाबाकडे नेलं. यावेळी भोंदूबाबाने तिला पाहिलं आणि अंगातलं भूत उतरवण्यासाठी एक विधी करण्याची गरज आहे असं म्हटलं.
भोंदूबाबाने पीडितेला, ‘तुझ्या अंगात ४ भूतं आहेत, तुझ्या भविष्यासाठी ते चांगले नाही, तुला बाळ होणार नाही आणि तुझा नवरा ही जिवंत राहणार नाही अशी भीती दाखवली आणि विधीसाठी त्या अल्पवयीन तरुणीला नालासोपारा येथील राजोडी बिच वरील एका हॉटेल्स मध्ये नेऊन दोघांनी सामूहिक अत्याचार केला. प्रेम पाटील आणि करण पाटील अशी आरोपींची नावे आहेत. आपल्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली. यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 37 (2), 64, 64 (2), (1) 41 सह पोस्को कायदा कलम 4, 8, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधित घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्यटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या काही तासांनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना वसई न्यायालयाने १२ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता पोलिस पथक या घटनेचा कसून तपास करत आहे. तसेच या आरोपींनी इतरही मुलींसोबत असं कृत्य तर केले नाही ना? याचाही शोध घेतला जात आहे. आता परिसरातील नागरिकांनी या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.