‘बंबय्या’चा गुन्हेगारी कारनामा अखेर संपला! आर.ए.के. मार्ग पोलिसांची मोठी कामगिरी, ७० हून अधिक गुन्ह्यांमध्ये वॉंटेड आरोपी अटकेत
मुंबई – मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ४ अंतर्गत आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्याने कार चोरी व कारमधील महागडं साहित्य चोरणाऱ्या एका कुख्यात सराईत गुन्हेगारास अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी जुनेद युनुस शेख उर्फ ‘बंबय्या’ (वय ३५, रा. जुना खार, मुंबई) याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरातमध्येही तब्बल ७० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
२६ ते ३० जून २०२५ दरम्यान फिर्यादी संजय पांडुरंग ठोंबरे यांनी त्यांची लाल रंगाची होंडा सिटी कार (एमएच-०३-२-४६२५) वडाळा येथील युंगाडा पेट्रोल पंपाजवळ पार्क केली होती. काही अज्ञात व्यक्तीने ही कार चोरी केल्याने आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी वडाळा, शिवडी, काळाचौकी, माटुंगा, सायन, भायखळा आदी परिसरातील १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासली. यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने लिंकिंग रोड, सांताक्रूझ येथे सापळा रचून आरोपी ‘बंबय्या’ला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली कार तसेच एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील तीन मोबाईल्सही जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हेगारी क्षेत्रात ‘बंबय्या’चा दरारा
आरोपी ‘बंबय्या’ने पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, नाशिक, रायगड तसेच गुजरातमधील अनेक भागांमध्ये वाहन व साहित्य चोरीसंबंधी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत ७० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सह पोलीस आयुक्त श्री. नारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ श्रीमती रागसुधा आर., आणि सहायक पोलीस आयुक्त माटुंगा विभाग श्री. योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप ऐदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे, महेश मोहिते, पो.उपनिरीक्षक सुरेश घार्गे, पोलीस हवालदार अनिल कोळेकर, काशिनाथ शिवमत, रोशन कांबळे, गोविंद ठोके, पोलीस शिपाई समिकांत म्हात्रे व अमित रामसिंग यांनी कारवाईत मोलाचे योगदान दिले. ही अटक पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि गुन्हेगारीला रोखण्यासाठीच्या कटिबद्धतेची साक्ष आहे.