“सायबर सुरक्षा व अंमली पदार्थ जनजागृतीसाठी महाविद्यालय संवाद मेळावा संपन्न!”
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – डोंबिवली पूर्व येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल ऑडिटोरिअम येथे ‘शाळा-महाविद्यालय संवाद मेळावा’ मोठ्या उत्साहात आणि प्रभावी पद्धतीने पार पडला. या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट अंमली पदार्थांविषयी जनजागृती आणि सायबर सुरक्षेबाबत महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राचार्यांना प्रशिक्षण देणे हे होते. या उपक्रमाची संकल्पना ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मांडली होती. त्याअंतर्गत, प्रत्येक महाविद्यालयातून ५ विद्यार्थी, ५ प्राध्यापक आणि प्राचार्य यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाविद्यालयात या विषयांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी या संकल्पनेची अंमलबजावणी केली आहे.
मेळाव्यास पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, तसेच ३० शाळा व १२ महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश जवादवाड यांच्या प्रस्तावनेने झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे महत्त्व पटवून दिले आणि ओटीपी शेअर न करणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, अशा प्राथमिक उपायांची माहिती दिली.
सायबर तज्ज्ञ अभिषेक सोनार यांनी सायबर गुन्हेगारी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दुरुपयोग आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना एक सायबर सुरक्षा पुस्तिका देखील वितरित केली. नारकोटिक्स सेलचे पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले यांनी अंमली पदार्थांचे प्रकार, त्याचे परिणाम आणि त्यांच्या तपासातील अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या जागरूक केले.
इगल ब्रिगेडचे अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर यांनी ‘पोलीस मित्र’ या उपक्रमाविषयी माहिती दिली व नागरिकांनी पोलिसांशी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कॉज फाउंडेशनचे जितेश आणि कल्पना मोरे यांनी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवावर्गाच्या मानसिकतेबाबत माहिती दिली आणि महिला सुरक्षेसंबंधी महत्त्वाचे मुद्दे विशद केले. त्यांनी ऑडिओ-व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे सखोल माहिती दिली.
महानगरपालिका शिक्षण विभागाचे सी.आर.सी. प्रमुख युवराज महाले आणि रॉयल कॉलेजचे प्राचार्य विवेक पाटील यांनी उपक्रमाचे स्वागत करून भविष्यातील अंमलबजावणीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा समारोप सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी केला. त्यांनी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करत अंमली पदार्थ व सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सिने अभिनेते सतिश नायकोडी यांनी केले. त्यांनी आपल्या खास शैलीने कार्यक्रमात रंग भरले. कार्यक्रमात सुमारे १२५ ते १५० प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त सहभाग होता.