पालघरच्या तरुणाची युरोपात फसवणूक; सरसरकारकडे मागितली मदत
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघर जिल्ह्यातील एका तरुणाची अल्बानिया या देशात नोकरीच्या आमिषाने नेऊन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उमेश किसन धोडी असे पीडित तरुणाचे नाव असून, व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ मेसेज पाठवून या तरुणाने भारतात परत येण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. उमेश किसन धोडी हा पालघर शहरात असलेल्या बच्चू मिया चाळ येथील रहिवासी आहे. उमेश याला वडोदरा येथील आयक्यूआर कंपनीच्या एका एजंटच्या माध्यमातून युरोपमधील अल्बानिया या देशातील ड्युरेस, रुगा वाथ ट्रुजा येथील “अमेक सोल्युलर ग्रुप” या कंपनीमध्ये नोकरी देण्यात आली होती. उमेशचे कुटुंबीय त्याची पत्नी या सर्वांनी अल्बानिया येथे जाण्यासाठी पाच ते सहा लाख रुपये इथून तिथून कर्ज काढून जमा केले. त्यानंतर उमेश अल्बनिया येथे नोकरीसाठी गेला. २५ एप्रिल रोजी उमेश अहमदाबाद विमानतळ येथून अल्बानिया येथे गेला.
त्या ठिकाणी जवळपास तीन महिने त्याने काम केले. मात्र, कंपनीकडून नियमांनुसार कोणतीही सुविधा न मिळाल्याने त्याने आक्षेप घेतला. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याने कंपनीला पुन्हा आपल्या घरी, भारतात पाठवण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे एजंटला देखील याबाबत विनवण्या केल्या मात्र उमेशची कोणतीही मदत करण्यात आली नाही. आयक्यूआर कंपनीचा एजंट रफिक घाची याने युरोपमध्ये चांगली नोकरी देतो असे सांगून उमेशची फसवणूक केली आहे. उमेश अल्बानिया देशात अडकून पडला असून, त्याने त्याची पत्नी आनंदी धोडी व मनसैनिक तुलसी जोशी यांना फोन करून व्हाट्सअपवर व्हिडिओ पाठवून आपली आपबीती सांगितली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास उमेशचा आपल्या पत्नीसोबत संवाद झाला. मात्र त्या नंतर उमेशला त्याचे कुटुंबीय पत्नी सतत फोन करत असून त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. सरकारने याकडे लक्ष घालून उमेशला भारतात परत आणावे अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.