कल्याणमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न उधळला; दोघांना बाजारपेठ पोलिसांकडून अटक
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण पश्चिमेतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनला फोडून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मंगेश जगताप आणि नौशाद अहमद अन्सारी अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्ह्याच्या काही तासांतच त्यांना ताब्यात घेतले. ही घटना अत्रे हॉल जवळील सेंट्रल बँकेच्या एटीएममध्ये घडली. आरोपींनी रात्रीच्या वेळी दगडाच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मशीनमधील रक्कम मिळवण्यात यश आले नाही. या हल्ल्यामुळे एटीएम मशीनचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर बँकेच्या मॅनेजरने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला. काही तांत्रिक माहितीच्या आधारे आणि गोपनीय माहितीनुसार कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
या कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रेम बागुल, रमाकांत पाटील, रवींद्र भालेराव, परमेश्वर बाविस्कर तसेच पोलीस शिपाई अरुण आंधळे आणि राहुल इशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेवर विश्वास वाढला असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.