रिक्षा चालकाची उर्मट वर्तणूक महागात; कल्याण आरटीओकडून साडे सहा हजारांचा दंड
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर एका प्रवाशाच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षा चालकावर उपप्रादेशिक परिवहन विभागाने तात्काळ आणि कठोर कारवाई केली आहे. नेतिवली, कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या रूपेश केणे या रिक्षा मालकावर ६,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर रिक्षा चालकवर्गात अस्वस्थता पसरली आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे अकरा वाजता घडली. एक प्रवासी भिवंडीला जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना, रस्त्याच्या विरुद्ध बाजूने आलेल्या एका रिक्षाने थेट त्याच्यावर चाल करून येण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत प्रवाशाने बाजूला होत स्वतःचा बचाव केला. मात्र, जेव्हा त्याने याबाबत रिक्षा चालकाला जाब विचारला, तेव्हा उलटच त्याला धमकावण्यात आले. “झालं असतं तर बघून घेतलं असतं,” अशी अरेरावीची भाषा चालकाने वापरल्याने तणाव निर्माण झाला. यानंतर इतर रिक्षा चालकही तेथे जमा झाले आणि प्रवाशावरच उलटसुलट प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.
प्रवासी मुंबईतील एका नामांकित माध्यम संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत असून, त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांच्याकडे तक्रार दाखल केली. बारकुळ यांनी तातडीने मोटार वाहन निरीक्षकांना कल्याण स्थानक परिसरात पाठवले. तपासात संबंधित रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आणि आरटीओ कार्यालयात हजर करण्यात आले. कार्यालयात करण्यात आलेल्या तपासणीत रूपेश केणे यांच्याकडे पीयूसी प्रमाणपत्र नसल्याचे आणि वाहनाचा विमा कालबाह्य झाल्याचे आढळले. यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला.
पीयूसी प्रमाणपत्र नसल्याबद्दल – ₹२,०००
विमा नसल्याबद्दल – ₹४,०००
उर्मट वर्तन केल्याबद्दल – ₹५००
एकूण दंड: ₹६,५००
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आरटीओ अधिकारी आशुतोष बारकुळ म्हणाले, “रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत. प्रवाशांशी उर्मट वर्तन, बेकायदेशीर मार्गिकेचा वापर आणि अरेरावी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.”
या तात्काळ कारवाईने कल्याणमधील प्रवाशांना दिलासा मिळाला असून, रिक्षा चालकांना देखील शिस्तीचा इशारा मिळाला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.