स्पा सेंटरच्या आड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; शिवसेना शिंदे गटाच्या युवा नेत्यावर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नांदेड – शहरातील कॅनॉल रोड येथील एका तीन मजली इमारतीत स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा भांडाफोड करत भाग्यनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली. ‘रेड ओके’ नावाच्या या स्पा सेंटरवर शनिवारी रात्री गोपनीय छापा टाकून पोलिसांनी तिघा ग्राहकांसह स्पा मॅनेजरला ताब्यात घेतले. यावेळी चार महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचा जिल्हा प्रमुख अमोघसिंघ साबळे याच्यासह पाच जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उघड होताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
स्पा सेंटरच्या आड धंदा!
कॅनॉल रोड हे शहरातील वर्दळीचे ठिकाण असून, या परिसरात ‘रेड ओके’ नावाचे स्पा सेंटर कार्यरत होते. भाग्यनगर पोलिसांना या ठिकाणी अनैतिक धंदे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक नरेश वाडीवाले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून शनिवारी रात्री छापा टाकला. छाप्यादरम्यान तीन पुरुष आणि चार महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी आपत्तीजनक साहित्य आणि पुरावे देखील जप्त केले.
शिंदेच्या युवा सेना जिल्हा प्रमुखाचा धक्कादायक सहभाग
या कारवाईदरम्यान पोलिसांनी नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड यांच्यासह चार महिलांना ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी पंकज जांगीड (स्पा चालक) आणि घरमालक अमोलसिंग उर्फ अमोघसिंघ साबळे हे फरार झाले आहेत. विशेष म्हणजे अमोघसिंघ साबळे हा शिंदे गटाच्या युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे. तपासात उघड झाले की, तो आणि पंकज जांगीड यांनी पार्टनरशिपमध्ये हा व्यवसाय सुरू केला होता.
पीडित महिला नागपूर व आसाममधील
स्पा सेंटरमधून ताब्यात घेतलेल्या चार महिलांपैकी तीन महिला नागपूरच्या असून, एक महिला आसाम राज्यातील रहिवासी आहे. या महिलांची सुटका करून त्यांना राज्य महिला गृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडीवाले यांच्या तक्रारीवरून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. कारवाईत विनोद देशमुख, सचिन शिंदे, विशाल माळवे, गजानन खेडे, निवृत्ती घुले, सविता केळगेंद्रे, सविता बाचेवाड या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
राजकीय वर्तुळात खळबळ
या प्रकरणामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या शिंदे गटावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. युवा सेनेच्या नावाखाली चालणाऱ्या या गोरखधंद्यामुळे सामान्य जनतेत संतापाची लाट असून, कडक कारवाईची मागणी होत आहे.