“ठाणे पोलीस आयुक्तालयाचा तक्रार निवारण दिन यशस्वी; १०७९ नागरिकांनी घेतला सहभाग”
ठाणे : १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयात दिनांक २ ऑगस्ट (शनिवार) व ३ ऑगस्ट (रविवार) रोजी “तक्रार निवारण दिन” आयोजित करण्यात आला. या उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निरसन करण्यावर भर देण्यात आला. या दोन दिवसीय कार्यक्रमात १५०४ अर्जदारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी १०७९ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेळी ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
तक्रार निवारण दिनात ९८१ अर्जांचे तात्काळ निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारदारांनाही बोलावून त्यांच्या तक्रारींचे लवकरात लवकर निरसन करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत समाधान मिळाले असून, त्यांनी ठाणे शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत. असे शैलेश साळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर यांनी कळविले आहे.