बांद्रा पूर्व रेल्वे पटरीवर खुलेआम ड्रग्सचा धंदा – निलोफर व सिकंदर बाली बेधडकपणे रॅकेट चालवत असल्याचा आरोप!
मुंबई / प्रतिनिधी
मुंबईसारख्या महानगरात, पोलीस ठाण्याच्या व रेल्वे स्थानकाच्या अगदी शेजारी, खुलेआम ब्राऊन शुगरसारख्या जीवघेण्या अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. बांद्रा पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ, गरीब नगर मशीदच्या बाजूला, आणि निर्मल नगर पोलीस बीट चौकीच्या जवळच निलोफर बाली आणि तिचा नवरा सिकंदर बाली हे दोघं रेल्वेच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट बेधडकपणे चालवत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
रेशनच्या रांगेसारखी दृश्यं
प्रत्येक दिवशी मजूर व स्थानिकांनी ब्राऊन शुगरसाठी रांग लावलेली दिसते. रेल्वे ब्रिजवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना हे दृश्य स्पष्टपणे दिसते, मात्र बांद्रा रेल्वे पोलीस आणि निर्मल नगर पोलीस यांना हे का दिसत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कायदा कुचकामी?
राज्य सरकारकडून “ड्रग्स फ्री महाराष्ट्र” मोहीम राबवली जात असताना, या खुलेआम चालणाऱ्या रॅकेटविरोधात बांद्रा पोलिसांकडून ठोस पावले न उचलली जाणे धक्कादायक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निलोफर व सिकंदर बाली यांच्यावर यापूर्वीही अनेक अंमली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.
साकिनाकाच्या धडाकेबाज कारवाईचा नमुना!
याच काळात, पोलीस उपायुक्त दत्ता नलवाडे यांच्या नेतृत्वाखाली साकिनाका पोलिसांनी तब्बल ४०० कोटींचे एमडी ड्रग्स जप्त केले. वसई, मैसूर व पवई येथून ८ आरोपींना अटक झाली.
मग प्रश्न राहतो की, बांद्रा आणि निर्मल नगर पोलीस तसेच अमली पदार्थ विरोधी पथक यांच्याकडून याच पातळीची कारवाई का होत नाही?
मुंबई पोलीस आयुक्तांशी अपेक्षा
स्थानिक नागरिक व प्रवाशांनी मुंबई पोलीस आयुक्त श्री. देवन भारती यांच्याकडे तातडीची कारवाई करण्याची विनंती केली आहे. निलोफर-सिकंदर बाली यांचे नेटवर्क फोडून या ड्रग्स माफियांना तुरुंगात डांबण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिस यंत्रणेची झोप उडवणारी ही बाब – अंमली पदार्थविरोधी विभाग, रेल्वे सुरक्षा बल व मुंबई गुन्हे शाखेने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी जनतेची ठाम मागणी आहे.