कोथरुड पोलीसांवर तीन तरुणींना जातीवाचक शब्द वापरत मारहाण केल्याचा गंभीर आरोप; सुप्रिया सुळे यांची दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

Spread the love

कोथरुड पोलीसांवर तीन तरुणींना जातीवाचक शब्द वापरत मारहाण केल्याचा गंभीर आरोप; सुप्रिया सुळे यांची दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – कोथरुड पोलीस ठाण्यात तीन तरुणींना जातीवाचक शब्द वापरत मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या तरुणींनी पोलीस कर्मचाऱ्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचं सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील एका विवाहित मुलीला सासरकडील त्रासामुळे काही काळासाठी विश्रांती घेण्यासाठी पुण्यात कोथरुडमधील तिच्या तीन मैत्रिणींकडे राहायला आणण्यात आले होते. या मुलीची “मिसिंग” तक्रार तिच्या कुटुंबियांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. मोबाईल लोकेशनच्या आधारे संभाजीनगर पोलीस कोथरुडपर्यंत पोहोचले आणि या मुलीचं लोकेशन कोथरुडमध्ये असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलीस थेट या तीन तरुणींच्या फ्लॅटवर पोहोचले आणि चौकशी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी उग्र भाषेत बोलत, कपड्यांवरून आक्षेप घेत अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. तसेच त्यांना कोथरुड पोलीस ठाण्यात नेऊन तिथेही शिवीगाळ व मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. या तिन्ही तरुणी पुण्यात नोकरी करत असून त्या कोथरुड परिसरात वास्तव्यास आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, त्यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “महिलांवरील असा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.” दरम्यान, कोथरुड पोलीस ठाण्याचे अधिकृत सूत्रांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संबंधित मुलींची फक्त मिसिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी विचारपूस करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा शिवीगाळ झालेली नाही. चौकशीदरम्यान आवश्यक प्रश्न विचारले गेले होते.” सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित तरुणींचे जबाब नोंदवले जात आहेत. राज्य महिला आयोग तसेच इतर महिला संघटनांनीही या घटनेबाबत दखल घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon