मुंबईत मुसळधार पावसाचा कहर सुरुच; भांडुपमध्ये भिंत कोसळून टेकडीवरील पाच घरं पडली, कोणतीही जीवितहानी नाही

Spread the love

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर सुरुच; भांडुपमध्ये भिंत कोसळून टेकडीवरील पाच घरं पडली, कोणतीही जीवितहानी नाही

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – गेल्या रविवार पासून मुंबईसह राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. अशातच मंगळवारी भांडूप परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. जोरदार पावसामुळे भांडुपमधील खिंडीपाडा भागात ओमेगा हायस्कूलच्या मागे असलेली एक मोठी भिंत कोसळली. भिंतीसोबत काही घरेही पडली. सुदैवाने, धोक्याची सूचना मिळाल्यानंतर घरांना तातडीने रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. भांडूपच्या खिंडीपाडा भागात ही घटना घडली. सततच्या पावसामुळे ५० फूट उंच असलेल्या टेकडीच्या संरक्षक भिंतीला तडे गेले. त्यामुळे भिंत आणि तिच्याजवळची घरे कोसळली. “मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंतीला तडे गेले आणि अनेक घरे बघता बघता कोसळली,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. धोका लक्षात येताच घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. लोकांनी या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले आहेत. भिंतीसोबत पाच घरे पडली, पण कोणतीही जीवीत हानी झाली नाही. “घरातील सर्व लोक सुरक्षित आहेत,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेनंतर मुंबईच्या टेकडी भागात असणाऱ्या झोपड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या कुर्ला, कांदिवली पूर्व, दहिसर, मुलुंड, भांडूप, मालाड या ठिकाणच्या टेकडी भागात अनेक अनधिकृत झोपड्या आहेत. सुदैवाने भांडूपच्या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. परंतु वाईट वेळ सांगून येत नसल्याने प्रशासनाने अशा धोकादायक झोपड्यांचा निकाल लावावा अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात राज्यात आणखी पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी अंधेरी सबवे बंद असल्याची माहिती दिली. सबवेमध्ये १ ते १.५ फूट पाणी साचले आहे. त्यामुळे गोखले पूल आणि ठाकरे पुलावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. तुर्तास हवाई वाहतुकीवर फारसा परिणाम झाल्याचे वृत्त नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon