हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना मी कोर्टात खेचणार – माणिकराव कोकाटे
रमी प्रकरणानंतर कृषीमंत्री संतापले; पत्रकार परिषदेत विरोधकांना घेतले फैलावर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – विधान परिषदेत कृषीमंत्री माणिककराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आरोपांची राळ उडवून दिली होती. राज्यभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तर मंगळवारी पत्रकार परिषद घेत कृषीमंत्र्यांनी विरोधकांना फैलावर घेतले. आपण विरोधकांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. विरोधकांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे कोकाटे म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्याविरोधात मुद्दामहून अशी कारस्थानं करण्यात असल्याचा सूर आळवला. याबाबत मला एकच सांगायचं आहे की हा इतका छोटा विषय आहे. हा विषय लांबला का कळलं नाही. मी खुलासा केला आहे. ऑनलाइन रमी काय माहीत आहे का. ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं अटॅच नाही. माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना मी कोर्टात खेचणार आहे, असा इशारा कृषीमंत्र्यांनी विरोधकांना दिला.
रमी नाहीच. माझी लक्ष्यवेधी होती तेव्हा. मला ओसडीकडून माहिती घेण्यासाठी एसएमएस करावा लागतो. किंवा फोन करावा लागतो. मी मोबाईल उघडताच तो गेम आला. तो स्किप करता आला नाही. मोबाईल नवीन होता. स्किप करणारा व्हिडीओ समोर आला नाही. मोबाईल उघडल्यावर कोणताही गेम स्किप होत नाही. दहा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ समोर आला. पूर्ण व्हिडिओ का दाखवला नाही, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राच्या लक्षात आलं असतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे. चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांना राजीनामा देणार असल्याचे कोकाटे म्हणाले. व्हिडीओ कुणी काढला त्यात मला जायचं नाही. सभापती त्याची चौकशी करतील. त्यात काही नाही. ज्यामुळे शेतकरी आणि छावा संघटनेच्या भावना दुखावतील. मी वेडंवाकडं काही केलं नाही. शेतकऱ्यांशी संबंध नाही अशा गोष्टी दाखवल्या गेल्या. दोषींचे सीडीआर चेक करा. जे कोणी भाग घेतला ते समोर येऊ द्या. कृषी मंत्री म्हणून वारंवार समोर आणलं जातं, त्याची चौकशी करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार. तुम्ही राज्यभर माझी बदनाम केली. तुम्ही अशी कशी एखाद्या मंत्र्याची बदनामी करता. चौकशीत जे असेल ते सत्य बाहेर येईल. कोण कोण नेते कोणा कोणाशी बोलतात याचा सीडीआर काढण्याची विनंती करणार आहे. माझ्याबाबतीत असा इतिहास आहे की माझ्याविरोधात चुकीचे असे काही सापडलेले नाही, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.