चेंबूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ६५ हरवलेले मोबाइल परराज्यातून मिळवून तक्रारदारांना परत
रवि निषाद / मुंबई
मुंबई : चेंबूर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत ६५ हरवलेले मोबाईल विविध राज्यांतून शोधून काढत मूळ धारकांकडे परत केले. केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी या केंद्र शासनाच्या पोर्टलचा वापर करून ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली असून, एकूण ७ लाख ३५ हजार ४०० रुपयांची मोबाइल मालमत्ता तक्रारदारांना २१ जुलै २०२५ रोजी प्रत्यक्ष प्रदान करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण कारवाई चेंबूर परिमंडळ-६ चे पोलीस उपायुक्त श्री. समीर शेख, चेंबूर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामराव ढिकले, चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद राणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनीष आवळे आणि (का.व.सु.) सहायक पोलीस निरीक्षक दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, महिला पोलीस शिपाई मांढरे (मपोशि १५१४८५) आणि महाडिक (मपोशि १५१६१२) यांनी विशेष मेहनत घेतली. केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी पोर्टलवरील तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईलचे स्थान निश्चित करून आणि संबंधित राज्यांमधील वापरकर्त्यांचा शोध घेऊन हरवलेले मोबाईल पुनर्प्राप्त करण्यात आले. मोबाइलचे स्थान केवळ मुंबईतच नव्हे तर गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ, कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये सापडले. अशा प्रकारे परराज्यात जाऊनही मोबाइल शोधून तक्रारदारांच्या हस्ते प्रत्यक्षात मोबाईल सुपूर्द करण्यात आले, हे चेंबूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरते. चेंबूर पोलिसांची ही कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी असून, हरवलेला मोबाईल मिळू शकतो यावर पुनरुज्जीवन घडवणारी आहे. अशा प्रकारच्या कार्यवाहीमुळे सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक बळकट होईल, यात शंका नाही.