व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याची दखल – जनजागृती विद्यार्थी संघाला ‘एकता पुरस्कार’ अभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते प्रदान
रवि निषाद / मुंबई
मुंबई : व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जनजागृती विद्यार्थी संघाला ‘एकता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबईतील वर्सोवा येथे दिनांक १९ जुलै २०२५ रोजी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमली पदार्थ सेवन प्रतिबंध जनजागृती अभियान कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री श्री. योगेश कदम, स्थानिक आमदार श्री. हारून खान, श्रीमती अमृता फडणवीस, श्रीमती वर्षा विद्या (नशाबंदी मंडळ महाराष्ट्र) आणि एकता मंचचे अध्यक्ष श्री. अजय कौर यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमात जनजागृती विद्यार्थी संघटनेच्या वतीने श्री. संतोष सुर्वे (सेक्रेटरी, जनजागृती विद्यार्थी संघ), श्रीमती गीता सुर्वे, शाकीर बागवान आणि अफसर खान यांनी एकता पुरस्कार स्वीकारला. त्यांनी आपल्या मनोगतातून हा सन्मान फक्त संघटनेचा नसून समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे, असे नमूद करत आयोजकांचे व सहकार्य करणाऱ्या हितचिंतकांचे आभार मानले. जनजागृती विद्यार्थी संघ गेल्या काही वर्षांपासून युवकांमध्ये व्यसनमुक्ती, पुनर्वसन, आणि सामाजिक प्रबोधन यासाठी सातत्याने कार्यरत आहे. शाळा, महाविद्यालये आणि समाजातील विविध स्तरांमध्ये जनजागृती मोहीमा राबवून अनेकांना मदतीचा हात देण्यात या संस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे.
हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रयत्नांची दखल असून, पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. “समाजात खऱ्या अर्थाने बदल घडवण्यासाठी अशा संघटनांचे योगदान अनमोल आहे,” असे गौरवोद्गार अरबाज खान यांनी यावेळी काढले. हा सन्मान जनजागृती विद्यार्थी संघाच्या सामाजिक प्रतिबद्धतेला मिळालेली पावती मानली जात असून, व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी त्यांच्या कार्यास आता अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.