भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई; नामांकित कंपनीच्या नावाने बनावट बटरची विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड

Spread the love

भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई; नामांकित कंपनीच्या नावाने बनावट बटरची विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – नामांकित कंपनीच्या नावाने बनावट बटरची विक्री करणारे रॅकेट अन्न आणि औषध प्रशासनाने उघड केले असून भिवंडीतील एका गोदामात छापा मारत बटरची १८० पाकिटे, पामोलिन तेल, रिकामी पाकिटे असा एक लाखाहून जास्त किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात दोघांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. भिवंडी शहरात एका नामांकित कंपनीच्या नावाने बनावट बटर तयार केले जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला (एफडीए) मिळाली होती. त्यानंतर एफडीएचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया, अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी कर्णे आणि पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या नागाव, भुसावळ कम्पाउंड येथील एका गोदामामध्ये अचानक छापा टाकला. त्यावेळी रिफाइंड पामोलिन तेल, वनस्पती, मीठ तसेच बटरचा फ्लेवर यांचा वापर करून ‘हॅण्ड मिक्सर’ मशीनने बटर तयार करण्यात येत असल्याचे आढळले, अशी माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बटर तयार केल्यानंतर नामांकित कंपनीच्या नावाने १०० ग्रॅम तसेच ५०० ग्रॅम वजनाची बटरची पाकिटे विक्री करण्यात येत होती. या कारवाईमध्ये बटरची पाकिटे तसेच ७३.४ किलो पामोलिन तेल, ७३.४ किलो वनस्पती तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. बनावट लेबलची रिकामी पाकिटे, रिकामे खोकेही हस्तगत करण्यात आले असून या साठ्याची एकूण किंमत एक लाख १३ हजार इतकी आहे. या पेढीकडे बटर उत्पादनाचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे. बटरचा हा बेकायदा कारखाना बंद करण्यात आला आला आहे. चाचणीसाठी काही नमुने देखील घेण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon