देवनार बूचडखान्यात मेलेल्या जनावरांचे कुजके अवशेष; दुर्गंधीने व्यापारी, गवळी, दलाल भयभीत – प्रशासन गप्प
रवि निषाद / मुंबई
मुंबईच्या एम पूर्व विभागातील देवनार बूचडखाना येथे सध्या कुजलेल्या मृत जनावरांच्या दुर्गंधीमुळे चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. इथल्या परिसरात जिकडे तिकडे मेलेली जनावरे पडलेली दिसत असून त्यांच्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतप्त वातावरण निर्माण करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत जनावरांचे मृतदेह दोन ते तीन दिवसांपर्यंत पडून राहतात आणि त्यांची विल्हेवाट लावण्यात प्रशासन गंभीरतेने कार्य करत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत जनावरांपासून पसरणाऱ्या रोगांचा धोका लक्षात घेता स्थानिक व्यापारी, गवळी आणि दलाल यांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढत असल्याची माहितीही मिळते. या संपूर्ण प्रकरणात देवनार बूचडखान्याचे महाव्यवस्थापक श्री. कलीम पाशा पठान यांची थेट जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे. मृत जनावरांविषयी संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती असूनही वेळेवर कारवाई केली जात नाही. मृत जनावरे तसेच पडून राहतात आणि त्यांचा सडलेला वास संपूर्ण परिसरात पसरतो.
यासंबंधी अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही काही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला असून स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, महाव्यवस्थापक श्री. कलीम पाशा पठान यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी फोन उचलणे टाळले. यावरून त्यांच्या ढिसाळ प्रशासनशैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आल्याची भावना स्थानिक व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे.
देवनार सारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कत्लखान्यात अशा प्रकारची अस्वच्छता आणि दुर्लक्ष केवळ लोकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण करत नाही, तर संपूर्ण महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि परिसरात स्वच्छता राखण्याचे कठोर आदेश द्यावेत, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक संघटनांकडून करण्यात येत आहे.