नवी मुंबईतील खळबळजनक घटना!
लग्नाच्या आमिषदाखवत वारंवार अत्याचार,गर्भपाताचे फोटो दाखवून पुन्हा शरीरसंबंध ठेवले; आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – एकतर्फी प्रेमातून सुरु झालेला संबंध, नंतर लग्नाचे आमिष, त्याचाच आधार घेऊन वारंवार बलात्कार, जबरदस्तीचा गर्भपात आणि धमक्यांचं भयाण चक्र – उलवेतील एका महिलेच्या आयुष्याला गालबोट लावणाऱ्या या थरारक गुन्ह्याचा उलगडा आता समोर आला आहे. उलवे पोलिसांनी याप्रकरणी मोहित विरेंद्र सिंग (३०) या आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी आकाश यादव फरार आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२५ पासून मोहितने तिच्याशी ओळख वाढवली. सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी जवळीक साधली. नंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले, ज्यामुळे ती गर्भवती झाली. या गर्भधारणेच्या वेळी मोहितने एका मेडिकल शॉपमधून गर्भपाताच्या गोळ्या आणल्या आणि जबरदस्तीने तिला त्या घेण्यास भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता, गर्भपाताच्या वेळी झालेल्या रक्तस्त्रावाचे फोटो आणि व्हिडीओ त्याने घेतले. हेच फोटो दाखवून त्याने पुन्हा तिला लग्नाचे आश्वासन देत शरीरसंबंध ठेवले.
पीडित महिलेने जेव्हा प्रथम पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मोहितने तिला गोड बोलून फसवले. तो तिच्यासोबत घरात राहिला आणि दुसऱ्या दिवशी एका वकिलाकडे नेऊन ‘संयुक्त प्रतिज्ञापत्र’ तयार करून तीचाच वापर करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने स्पष्ट शब्दात तिला सांगितले की, आता आपण ‘लग्न’ केलं आहे, त्यामुळे तुझं काही चालणार नाही, आणि तू काहीही करू शकतेस – अशा प्रकारे तिला धमकावून तो पळून गेला. मोहितच्या घरात राहत असताना, दुसरा आरोपी आकाश यादव याने पीडित महिलेशी अश्लील वर्तन केले. तक्रारीनुसार, आकाशने तिचा विनयभंग केला व तिच्या अंगावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी आकाश यादवविरुद्धही गुन्हा दाखल केला असून तो अद्याप फरार आहे. उलवे पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की, “या गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू आहे. पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. फरार आरोपी आकाश यादवचा शोध सुरू असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल.” या घटनेने नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.