दारू घोटाळाप्रकरणात ईडीची मोठी कारवाई; वाढदिवसाच्या दिवशीच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला ईडी कडून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
रायपूर – अखेर दारू घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने अखेर कायद्याचा बडगा उचलला. ईडीने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याच्यासह इतर आरोपींविरोधात मोठी कारवाई केली.१८ जुलै रोजी भिलाई येथील चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीच्या हाती काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागली. त्यानंतर बराचवेळ चौकशी झाली. धाड टाकल्यानंतर थोड्याच वेळात चैतन्य याला अटक करण्यात आली. ईडीने शुक्रवारी सकाळी रायपूरमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचा मुलगा चैतन्य बघेल याच्याविरोधात दारू घोटाळ्यात कारवाई केली. भूपेश बघेल यांच्या घरासह इतर अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या दरम्यान ईडीने इतर घोटाळ्यासंबंधीत काही कागदपत्रे जप्त केली. त्यांनी चैतन्य बघेल याची चौकशी केली. त्याच्याकडून कुठलेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चैतन्य याला ताब्यात घेण्यात आले. तर त्याच्याकडून इतर माहिती आणि पुढील चौकशीसाठी त्याला ईडीने अटक केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी या छापेमारीविषयी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट केली आहे. विधानसभा सत्राचे कामकाज संपत असताना अखेरच्या दिवशी ईडीचे पथक त्यांच्या भिलाई येथील घरी पोहचले. अदानी यांच्या कंपनीसाठी तमनार येथे अनेक वृक्ष कापण्यात येणार होती. त्याविरोधात आम्ही सभागृहात आवाज उठवणार होतो. तेव्हा सरकार, साहेबांनी ईडीला आमच्याकडे अगोदर पाठवले, अशी तिखट प्रतिक्रिया बघेल यांनी दिली. शुक्रवारी विधानसभेत अदानी यांच्याविरोधात आवाज उठवणार होतो. पण अदानी यांना खूश करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी माझ्या घरी ईडीला पाठवले. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही त्यांच्यासमोर झुकणार सुद्धा नाही. आमची लढाई सुरूच राहिल. हा सत्यासाठीचा लढा आहे. ते देशातील सर्व विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहेत. ईडी यापूर्वी सुद्धा माझ्या घरी आलेली आहे.शुक्रवारी पण आली. आम्ही ईडीला सहकार्य करू. आमचा लोकशाही आणि न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. माहितीनुसार, शुक्रवारी चैतन्य बघेल यांचा वाढदिवस आहे. वाढदिवशी त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.