चुलत भावाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक फेकून खून करण्याचा प्रयत्न; कौटुंबिक वादातून पर्वती दर्शन परिसरात थरार, आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात चुलत भावाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक फेकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश संजय काळे (वय ४१, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्याचे नाव अमित काळे (वय ४०, रा. पर्वती दर्शन) असे आहे. याबाबत सुरेखा सुरेश काळे (वय ५४, रा. पर्वती दर्शन) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १६ जुलै रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता पर्वती दर्शन परिसरात घडली.
आदेश काळे यांची मुलगी घरातून निघून गेली होती. या प्रकारावरून आदेशने संतापाच्या भरात रस्त्यावर येत मोठमोठ्याने शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी शेजारी राहत असलेल्या अमित काळे याने “तु कशाला शिव्या देतोस?” असे विचारल्यावर आदेशने त्याचा राग मनात धरला आणि “तुच जबाबदार आहेस” असे म्हणत जवळच पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून अमितच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदेश काळे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.