मुंबई विमानतळावर ६२ कोटींच्या कोकेनसह महिला अटक; चॉकलेट-बिस्किट बॉक्समध्ये लपवली होती ३०० कॅप्सूल

Spread the love

मुंबई विमानतळावर ६२ कोटींच्या कोकेनसह महिला अटक; चॉकलेट-बिस्किट बॉक्समध्ये लपवली होती ३०० कॅप्सूल

मुंबई – आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत तब्बल ६२ कोटी रुपये किमतीच्या कोकेनसह एका भारतीय महिलेला अटक करण्यात आली आहे. संबंधित महिला कतारच्या दोहा शहरातून मुंबईत आली होती. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. महिला विमानतळावर पोहोचताच तिच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बिस्किट आणि चॉकलेटच्या डब्यांमध्ये काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. सखोल तपासणी केल्यानंतर या डब्यांमध्ये ३०० कॅप्सूल अडकवून ठेवलेले आढळले, ज्यामध्ये उच्च प्रतीचे कोकेन भरलेले होते.

डीआरआयने सांगितल्यानुसार, जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे किंमत सुमारे ६२ कोटी रुपये आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेने कबुली दिली आहे की, ती दोहातून ही कोकेनची खेप घेऊन आली होती आणि हा संपूर्ण प्रकार एका आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा भाग आहे. सदर महिलेविरुद्ध एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. डीआरआयने तिच्या चौकशीला सुरुवात केली असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे देशात अमली पदार्थाच्या तस्करीविरोधात मोठे यश मिळाले असून, ड्रग्ज माफियांनी भारतात अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी वापरत असलेल्या नवीन आणि क्लिष्ट युक्त्या उघडकीस आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon