दिग्गज अभिनेते-निर्माते धीरज कुमार यांचं निधन; आजारी पडण्याआधी इस्कॉन मंदिराला दिलेली भेट
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचं निधन झालं. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज कुमार यांनी १९६५ मध्ये कलाविश्वात पाऊल ठेवलं होतं. सुभाई घई आणि राजेश खन्ना यांच्यासोबत ते एका टॅलेंट शोच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. या शोचे विजेते राजेश खन्ना ठरले होते. १९७० ते १९८४ च्या दरम्यान त्यांनी २१ पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. धीरज कुमार यांनी ‘हिरा पन्ना’, ‘रातों के राजा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. त्यांनी १९७० आणि ८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आपला ठसा उमटवला. त्या काळातील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ‘रोटी कपडा और मकान’ (१९७४) या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका साकारली होती. यामध्ये त्यांनी मनोज कुमार आणि झीनत अमान यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं. धीरज यांनी ‘क्रिएटिव्ह आय’ नावाने निर्मिती कंपनीची स्थापना केली आणि तेच या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या कंपनीच्या बॅनरअंतर्गत ‘ओम नम: शिवाय’, ‘श्री गणेश’, ‘जय संतोषी माँ’,आणि ‘जप तप व्रत’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांची निर्मिती झाली. या मालिका त्यांच्या कथानकामुळे आणि अध्यात्मिक थीममुळे चर्चेत आल्या होत्या.
काही दिवसांपूर्वीच ते नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. सनातन धर्माच्या प्रसाराला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांचं कौतुक केलं होतं. “मी इथं नम्रतेच्या भावनेनं आलो आहे. जरी ते मला व्हीव्हीआयपी म्हणत असले तरी खरा व्हीव्हीआयपी इथे देव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्कॉन मंदिराच्या भव्यतेबद्दल आणि महत्त्वाबद्दल सांगितलं आणि त्यांचे शब्द नेहमीच प्रेरणादायी असतात. इथल्या लोकांचं प्रेम आणि आपुलकी मला खूप भावली आहे. ‘राधे राधे कृष्ण कृष्ण’ या शब्दांचं अध्यात्मिक महत्त्व खूप आहे. या मंदिराला भेट देऊन मला खूप मानसिक शांतता जाणवली”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.