संतापजनक! अहिल्यानगरमध्ये महिलेला नातेवाईकांकडून सामूहिक अत्याचार; एक अटकेत, तिघांचा शोध सुरू
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगरच्या केडगाव परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेला तिच्याच नातेवाईकांकडून सामूहिक अत्याचार व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून, पीडित महिलेला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि. १४ जुलै) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांच्यात यापूर्वी काही वाद झाले होते. याच वादातून एका आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले जात आहे, तर उर्वरित तिघांनी तिला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सर्व आरोपी हे पीडितेचे नातेवाईकच असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी डाळखुष काळे, अक्षय काळे, विनेश काळे आणि मोनेश ऊर्फ टाटा चव्हाण या चौघांविरोधात भारतीय दंड विधान व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील डाळखुष काळे या आरोपीला अटक करण्यात आली असून, उर्वरित तीघे फरार आहेत. कोतवाली पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.