पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; विक्रोळी ट्रॅफिक विभागातील घटना
रवि निषाद / मुंबई
मुंबई – विक्रोळी पार्कसाइट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शंकर भीकाजी सोळसे (वय ५६), असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर सोळसे हे आपल्या पत्नी रंजना शंकर सोळसे (वय ४८) यांच्यासोबत शिवराज सोसायटी, वर्षानगर, पार्कसाइट (पश्चिम) येथे वास्तव्यास होते. दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या पत्नीने त्यांना घरातील लोखंडी जिन्यावर साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांना माहिती दिली. यानंतर विजय प्रभाकर परब यांनी सदर माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली.
सूचना मिळताच पार्कसाईट पोलीस ठाण्याची मोबाईल पेट्रोलिंग युनिट, ड्युटी ऑफिसर तसेच दिवस पाळीचे पर्यवेक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर शंकर सोळसे यांना रुग्णवाहिकेने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉ. रमेश यांनी तपासणीअंती त्यांना सकाळी ११:३१ वाजता मृत घोषित केले. प्राथमिक तपासात आत्महत्येचे कोणतेही संशयास्पद कारण अथवा कोणतीही तक्रार समोर आलेली नाही. मृत शंकर सोळसे यांना दीड वर्षांपूर्वी एका अपघातात पायाला दुखापत झाली होती आणि त्यानंतर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. या दुखण्यामुळे त्यांना त्रास होत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक हूजरे करत असून अधिक तपास सुरू आहे. यासंदर्भात माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.