जालन्यात जुगार अड्ड्यावर छापा; आठ महिलांसह २१ जणांवर गुन्हा, ३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
जालना – शहरातील गुरू गोविंदसिंग नगर परिसरातील एका घरामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत आठ महिला आणि दोन अल्पवयीन मुलांसह एकूण २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकूण ३ लाख ४२ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरू गोविंदसिंग नगर येथे हिरासिंग मंगलसिंग टाक यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत महिला व पुरुष मिळून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे उघड झाले. पोलिस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने छापा मारून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान हामसिंग रामसिंग कलाणी, सचिनसिंग हामसिंग कलाणी, बालुसिंग इंदसिंग टाक, दोन बालअपचारी, तसेच आठ महिला आणि अन्य काही पुरुष तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी ६ हजार ७० रुपये रोख, तीन दुचाकी, १३ मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोप-खेळाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, तसेच पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, जमादार रामप्रसाद रंगे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, तसेच महिला पोलिस कर्मचारी शारदा गायकवाड, शालू केदार, ज्योती जाधव यांनी सहभाग घेतला. तपास जमादार शिंगणे करत आहेत. दरम्यान, जालना शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये आणि आठवडी बाजारांमध्ये देखील तिर्रट, झन्ना मन्ना यांसारखे जुगार खेळ सुरु असल्याचे चित्र आहे. पोलिस कारवायांनंतरही जुगार खेळणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. काही ठिकाणी तर शेतांमध्येही जुगार अड्डे सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.