“बीडमध्ये अमानुषता! निवृत्त फौजदाराला डांबून अमानुष मारहाण; पाणी मागितल्यावर तोंडावर केली लघुशंका”
पोलीस महानगर नेटवर्क
बीड – जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून, माजलगाव तालुक्यातील ढोरगाव शिवारात घडलेल्या एका अमानुष घटनेमुळे खळबळ उडाली आहे. फक्त बाराशे रुपयांच्या वादातून सालगड्याचे अपहरण करून त्याच्याकडून दीड लाखांची जबरदस्तीने लूट करण्यात आली. त्याची सुटका करण्यासाठी गेलेल्या निवृत्त सहाय्यक पोलिस फौजदाराला १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. हे सर्व आरोपींनी त्यांना खोलीत डांबून दोन तास अमानुषपणे मारहाण करत त्यांच्या तोंडावर लघुशंका केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (११ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मारहाणीत माजी फौजदाराच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली असून, चार ते पाच ठिकाणी फॅक्चर झाले आहेत. सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ‘बीडचा बिहार होत चाललाय का?’ असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पोलीस दलातील ३८ वर्षांची सेवा दिलेल्या माजी फौजदारावर असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.