“हल्दीराम कंपनीच्या मालकांना ९ कोटींचा गंडा; मुंबईतील व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल”

Spread the love

“हल्दीराम कंपनीच्या मालकांना ९ कोटींचा गंडा; मुंबईतील व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल”

पोलीस महानगर नेटवर्क

नागपूर – प्रसिद्ध खाद्यपदार्थ उत्पादक कंपनी ‘हल्दीराम’चे मालक आणि नागपुरातील उद्योजक कमल अग्रवाल यांची तब्बल ९ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीतील ७६ टक्के शेअर्स देण्याचे आमिष दाखवून मुंबईस्थित व्यावसायिक समीर लालानी व त्यांची पत्नी हिना लालानी यांनी हा गंडा घातला आहे. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्दीराम समूहाची उपकंपनी ओम इंडस्ट्रीज लिमिटेड हिने मुंबईतील रॉयल ड्रायफ्रूट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यादरम्यान, लालानी दाम्पत्याने कमल अग्रवाल यांना त्यांच्या कंपनीतील ७६ टक्के शेअर्स देण्याचे आश्वासन दिले.

त्यानुसार, सप्टेंबर २०२३ पर्यंत अग्रवाल यांनी टप्प्याटप्प्याने ९.३८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणुकीनंतरही अग्रवाल यांना कंपनीतून ना कोणताही नफा मिळाला, ना शेअर्स हस्तांतरित करण्यात आले. उलट, आरोपी समीर, हिना, त्यांचा मुलगा आलिशान लालानी आणि सहकारी प्रकाश भोसले यांनी वेळोवेळी खोटी आश्वासने देत अग्रवाल यांची दिशाभूल केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अग्रवाल यांनी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची आणि कागदपत्रांची अंतर्गत चौकशी केली असता, आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीची उलाढाल व नफा फुगवून दाखवला असल्याचे उघड झाले. हे लक्षात येताच त्यांनी पोलीसांत धाव घेतली.

कळमना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल होताच लालानी कुटुंब फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात लालानींच्या विरोधात इतरही फसवणुकीच्या तक्रारी आणि चौकशा प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात इतर गुंतवणूकदारही फसवले गेले असण्याची शक्यता आहे. पोलीस पथके आरोपींच्या मागावर असून, या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार व फसवणुकीचा सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon