मुंबईतील कुरार पोलिसांनी मोठ्या रिक्षा चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश; सात चोरीच्या रिक्षांसह रिक्षा चालक आणि मेकॅनिकला अटक

Spread the love

मुंबईतील कुरार पोलिसांनी मोठ्या रिक्षा चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश; सात चोरीच्या रिक्षांसह रिक्षा चालक आणि मेकॅनिकला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – तुम्ही भाड्याने घेतलेली रिक्षा चोरीची तर नाही ना? हा प्रश्न सध्या मुंबईतील अनेक रिक्षा चालक तसेच मालकांना सतावत आहे. कारण मुंबईत नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे रिक्षा प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कुरार पोलिसांनी एका मोठ्या रिक्षाचोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. चोरी केलेल्या रिक्षांची नंबर प्लेट बदलून त्या भाड्याने चालवणाऱ्या एका रिक्षाचालकासह आणि एका मेकॅनिकला बेड्या ठोकल्या आहेत. हे चोर स्वतःला रिक्षांचे मालक भासवून अनेक प्रवाशांना गंडा घालत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून कुरार परिसरात रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती. वारंवार होणाऱ्या या चोरीमुळे पोलिसांना यामागे एक संघटित टोळी असल्याचा संशय आला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत, चोरांचा शोध सुरू केला. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अथक प्रयत्न केले. अखेर या दोघांना पकडण्यात यश आलं.

या रिक्षाचालक आणि मेकॅनिकला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली, ज्यामुळे पोलीसही चक्रावले. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल सात चोरीच्या रिक्षा जप्त केल्या. हे चोर रिक्षा मिळवल्यानंतर, त्यांची मूळ नंबर प्लेट काढून टाकायचे. त्या जागी बनावट नंबर प्लेट लावायचे. त्यानंतर, या रिक्षा ते इतर सामान्य रिक्षांप्रमाणे भाड्याने द्यायचे आणि त्यातून पैसे कमवायचे. यामुळे प्रवाशांना कळूही शकले नाही की ते चोरीच्या रिक्षामध्ये प्रवास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, सध्या कुरार पोलीस या दोघांशिवाय या रिक्षा चोरीच्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा सखोल तपास करत आहेत. तसेच, आतापर्यंत एकूण किती रिक्षा चोरीला गेल्या आहेत, याबद्दलही अधिक माहिती गोळा केली जात आहे.” या अटकेमुळे रिक्षाचोरांना चांगलाच लगाम बसला आहे. मुंबईकरांनी भाड्याने रिक्षा घेताना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. प्रवाशांनी रिक्षामध्ये बसण्यापूर्वी रिक्षाचा नंबर आणि चालकाची ओळख पटवून घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon