फक्त एका महिन्यात न्याय ! खडकपाडा पोलिसांची झपाट्याने कारवाई; ६ तासांत दोषारोप, एका महिन्यात शिक्षा
कल्याण – खडकपाडा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यात अवघ्या एका महिन्यात न्यायालयाने दोषसिद्धी करून शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई पोलिस आणि न्यायव्यवस्थेच्या जलद आणि प्रभावी कार्यप्रणालीचे उदाहरण ठरते. गुन्हा रजि. क्रमांक ४६९/२०२५ हा गुन्हा ३ जून २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि ३२९(३) अंतर्गत दाखल करण्यात आला होता. याच दिवशी फक्त ६ तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल करून पोलिसांनी तत्काळ कारवाईचे संकेत दिले. सर्व प्रक्रियेला गती देत, ५ जून २०२५ रोजी आरोप निश्चिती आणि सुनावणी पार पडली. त्यानंतर केवळ महिन्याभरात, ८ जुलै २०२५ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ. अर्ती शिंदे (न्यायालय क्रमांक ३, कल्याण) यांनी निकाल दिला.
दोषी ठरवण्यात आलेल्या ओमकार विक्रांत निकाळजे (वय २९ वर्षे) याला भारतीय न्याय संहिता कलम ७४ अंतर्गत १ वर्ष सक्त कारावास, भारतीय न्याय संहिता कलम ३२९(३) अंतर्गत १ महिना साधा कारावास तसेच ५ हजार रुपये दंड, पैकी २५०० रुपये फिर्यादीस भरपाई आणि उर्वरित २५००रुपये सरकारकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. या जलद निकालासाठी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित पवार यांचे अथक परिश्रम, तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. प्रकाश शालिग्राम सपकाळे यांचे प्रभावी युक्तिवाद महत्त्वाचे ठरले. ही घटना जलद न्याय प्रक्रियेचा आदर्श ठरून इतर पोलिस ठाण्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.