अडल्ट व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग: चार्टर्ड अकाउंटंटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, दोन्ही आरोपींना बेड्या

Spread the love

अडल्ट व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग: चार्टर्ड अकाउंटंटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, दोन्ही आरोपींना बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे (वय ३२) यांनी सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या केली. अडल्ट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन व्यक्तींनी त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विष प्राशन करून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या तीन पानी सुसाईड नोटमध्ये, राहुल शेरू परवानी (२६) आणि सभा इकबाल कुरेशी (२२) ही दोघे जबाबदार असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. राज मोरे हे एका नामांकित फर्ममध्ये सीए म्हणून कार्यरत होते. पोलिस तपासानुसार, राहुल परवानीने राज मोरे यांचे खाजगी क्षणांचे व्हिडिओ गुप्तपणे चित्रीत केले आणि नंतर सभा कुरेशीच्या मदतीने ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना सातत्याने ब्लॅकमेल केले.

तपासात उघड झाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून राज मोरे आणि सभा कुरेशी यांची ओळख झाली. दोघांमधील ओळख हळूहळू जवळीक आणि शारीरिक संबंधात परिवर्तित झाली. याच काळात राहुल परवानीने राजचे खासगी व्हिडिओ चित्रीत केले. नंतर त्या व्हिडिओंचा वापर करून दोघांनी मिळून राज मोरे यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले. राज यांच्यावर मानसिक दबाव आणण्यासाठी आरोपी त्यांच्या वाकोला येथील राहत्या घरीही पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी राज मोरे यांना त्यांच्या आईसमोरच मारहाण केली, शिवीगाळ केली आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या अपमानास्पद व भयावह प्रसंगामुळे राज मोरे अत्यंत अस्वस्थ झाले आणि अखेर ६ जुलै रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या तीन पानी सुसाईड नोटमध्ये राज मोरे यांनी आपल्या मृत्यूसाठी राहुल परवानी व सभा कुरेशी यांना थेट जबाबदार धरले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीही पोलिसांना दिलेल्या जबाबात हेच सांगितले आहे.

राज मोरे यांच्या सुसाईड नोट आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे, वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६५९/२०२५ खाली खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), कलम ३०८(२), ३०८(३) (खंडणीसाठी धमकी व गुन्हेगारी हेतूने आर्थिक फसवणूक), कलम ३(५) (सायबर गुन्हे व गुप्त चित्रीकरण) तपासानुसार, राहुल परवानी याने एकट्याने २ कोटी ४४ लाख ८० हजार रुपये, तर सभा कुरेशीने २ लाख ६० हजार रुपये राज मोरे यांच्याकडून उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. वाकोला पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तींनाही ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. या घटनेने समाजात खळबळ उडाली असून सायबर ब्लॅकमेलिंगचा धोका किती गंभीर आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पोलिसांनी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करून दोषींना तात्काळ शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon