कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत ७१ गहाळ व चोरी झालेल्या मोबाईलचा शोध लावून नागरिकांना वितरण; रु
१२.२८ लाख किंमतीच्या मोबाईलचा समावेश
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत डोंबिवली विभागातील डोंबिवली पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस ठाणे व विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ व चोरी झालेल्या मोबाईल फोनचा शोध लावून, ते संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले. या उपक्रमासाठी पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, संजय जाधव तसेच परिमंडळ ३ कल्याणचे पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री. सुहास हेमाडे यांच्या पुढाकाराने विशेष पथके गठित करण्यात आली होती.
सीईआयआर पोर्टलच्या सहाय्याने तांत्रिक विश्लेषण करून सदर मोबाईल हस्तगत करण्यात आले:
डोंबिवली पोलीस स्टेशन – २३ मोबाईल
मानपाडा पोलीस ठाणे – २४ मोबाईल
विष्णुनगर पोलीस ठाणे – २४ मोबाईल
एकूण ७१ मोबाईल फोन, अंदाजे रु. १२,२८,०००/- रुपये किंमतीचे, तक्रारदारांची ओळख पटवून दिनांक ५ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता लेवा भवन, मंगल कार्यालय, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व) येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करून त्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास सपोआ डोंबिवली विभागाचे श्री. सुहास हेमाडे, तसेच डोंबिवली, मानपाडा व विष्णुनगर पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू शोधून त्यांना परत देण्याचा हा उपक्रम ठाणे शहर पोलीस दलाच्या जनहितकारी कार्याची साक्ष देतो. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.