आषाढी एकादशीचा भक्तिभाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Spread the love

आषाढी एकादशीचा भक्तिभाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

पोलीस महानगर नेटवर्क

पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरी भक्तिभावाने गगनभरली असून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो वारकरी ‘पंढरी’ नगरीत दाखल झाले आहेत. यानिमित्ताने आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा फडणवीस यांच्या समवेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. पूजेदरम्यान विठ्ठल मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाला खास पोशाख परिधान करून आरती करण्यात आली. पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून पूजा अर्पण केली.

पूजा कार्यक्रमानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांना शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती भेट म्हणून देण्यात आल्या. यंदाच्या आषाढी वारीत नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे कैलास आणि कल्पना उगले हे मानाचे वारकरी ठरले असून, त्यांनाही महापूजेचा सन्मान लाभला. मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते उगले दाम्पत्याचा शाल आणि मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “देवशयनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी महापूजेचे भाग्य लाभले. या दिवशी राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. विठूमाऊलीच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समाधान आणि प्रगती नांदो, हीच विनंती.”

संपूर्ण पंढरपूर नगरी ‘हरि बोल’च्या गजराने दुमदुमून गेली आहे. भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांची चरणधूळ आणि मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा यामुळे आषाढी एकादशीचे मंगल वातावरण अधिक पावन बनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon