२६/११ च्या हल्ल्यात १५० नागरिकांचा जीव वाचवणाऱ्या माजी सैनिकाचा राज ठाकरेंना प्रश्न?
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. दरम्यान, एका माजी कमांडो फोर्स सैनिकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी विचारले आहे की, मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी तुमचे योद्धे कुठे होते? या सैनिकाचे नाव प्रवीण कुमार तेवतिया आहे. २६/ च्या मुंबई हल्ल्यात प्रवीणने अनेक लोकांचे प्राण वाचवले होते. ताज हॉटेलमधील १५० लोकांना वाचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता या सैनिकाने राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे की मी उत्तर प्रदेशचा आहे. मी महाराष्ट्रासाठी माझे रक्त सांडले आहे. भाषेच्या नावाखाली देशाचे विभाजन करू नका, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. प्रवीण कुमार तेवतिया हे मरीन कमांडो फोर्स (मार्कोस) मध्ये होते. तेवतिया यांनी स्वतःचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. यामध्ये ते गणवेश परिधान करून हसत आहेत. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर यूपी लिहिलेले आहे आणि त्यांच्यी हातात रायफल देखील आहे. तेवतिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, २६/११ च्या हल्ल्यात मी मुंबई वाचवली. मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे.’ त्यांनी पुढे लिहिले की,मी ताज हॉटेल वाचवले. त्यावेळी राज ठाकरेंचे हे तथाकथित योद्धे कुठे होते? देशाचे विभाजन करू नका. हास्याला भाषा नसते.