शाळकरी मुलांचा १५ वर्षीय मुलीवर सामूहीक अत्याचार; शांतीनगर पोलिसांनी १३ ते १६ वयोगटातील सात जणांना घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – शाळकरी मुलांनी एका १५ वर्षीय मुलीवर सामूहीक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १३ ते १६ वयोगटातील सात जणांना ताब्यात घेतले आहे. लैंगिक अत्याचारानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली आहे. तर, ताब्यात असलेल्या एका मुलाच्या आईला बालकामगार अधिनियम (प्रतिबंध विनीयम) कलमाखाली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण भिवंडी शहरात खळबळ उडाली आहे. भिवंडी शहरात पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत वास्तव्यास आहे. आठवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिने शाळेत जाणे बंद केले होते. त्यानंतर परिसरातील एका महिलेच्या घरात ती घरकाम करण्यास जाऊ लागली. दरम्यान, महिला बाहेर गेल्यानंतर तिचा अल्पवयीन मुलगा पीडित तरुणीवर घरामध्येच लैंगिक अत्याचार करू लागला होता. एप्रिल २०२४ ते २२ जूनपर्यंत हा प्रकार सुरु होता. तसेच २५ आणि ३० मे या दिवशी रात्री १० वाजता परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी तिला एका गाळ्यामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर रात्री ११ वाजता आणखी काही मुलांनी तिचा त्या गाळ्यामध्ये विनयभंग केला.
लैंगिक अत्याचार झाल्याने पीडित मुलगी गरदोर झाली. घटनेची माहिती भिवंडीतील शांतीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी सात मुलांना ताब्यात घेतले आहे. ही सर्व मुले १३ ते १६ वयोगटातील आहेत. काही मुले शाळेत जातात. तर काहींनी शाळा सोडून दिली आहे. ताब्यात असलेल्या एका मुलाच्या आईविरोधात बालकामगार अधिनियम (प्रतिबंध विनीयम) १९८६ चे कलम १४ अन्वये गुन्हा दाखल असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण भिवंडी शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.